“अरे श्रेयस काय ठरवलं आहेस भारतात यायचं? सव्वा वर्ष होऊन गेलं !”
“आई, ठरवायला वेळ नव्हता.आणि काहीच नक्की नव्हतं कधी सुट्टी असणार आहे”
“पण त्या नादात किती उशीर झालाय, तिकिटं वाढली असतील खूप. त्यामुळे cancel करू नको अजिबात”
“बघू !”
अगदी नोव्हेम्बरमध्य पर्यंत अशी चालढकल केल्यावर जेव्हा मी finally विमान तिकिटं काढायची ठरवली तोपर्यंत ती जबरदस्त महाग झालेली. डायरेक्ट तिकीट सोडाच, stopover घ्यायचा म्हंटलं तरी नेहमी पेक्षा दुप्पट किंमत. न जाणं हा काही पर्यायच नव्हता. दीड वर्षांनी जाऊन कधी एकदा भाकरी, पुरणपोळी, भेळ, मिसळ वगैरेत वर ताव मारतोय असं झालेलं. पण मी हार मानणार नव्हतो. थोडं इकडे तिकडे शोधल्यावर मला एक तिकिट सापडलंच! तारखा जुळत होत्या, दर सुद्धा रास्त होता, पण…
Airline : EgyptAir
--- ऑ , हे कोणे? असो इजिप्त सरकार चं आहे तर चांगलं असेल.
Layover : 22 Hrs
मला वाटलं webpage गंडलं. २.२ तास वगैरे असेल. होतं असं कधी कधी. मी पेज रिफ्रेश केलं.
Layover : 22 Hrs
--- काय !!!!! हे वेडे झालेत का? २२ तास काय उंट बघत बसायचं का?
idea झुरळासारखी झटकून टाकायच्या आधी मी जरा tripadvisor वर जरा संशोधन केलं. कोणीतरी सुज्ञ प्रवाशाने त्याच्या अशाच मोठ्या layover बद्दल लिहिलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की जरी कुठे लिहिलं नसलं तरी EgyptAir ६ तासा पेक्षा मोठ्या layovers ना हॉटेल आणि खायची व्यवस्था करतं. दुसऱ्या एकाने सांगितलेलं कि त्याने ट्रिप पण केली तेवढ्या वेळात! मी लगेच फोन लावला. Frankfurt विमानतळावरचा त्यांच्या माणसाने पण मला हॉटेल ची खात्री दिली. वर २ चेक-इन बॅग न्यायची परवानगी. एवढं पुढे आलोच आहे तर म्हंटलं घ्यावी आपण पण रिस्क आणि करावं बुकिंग. फार फार तर विमानतळावरच्या कुठल्यातरी बाकावर झोपायला लागेल. पण सगळं जमून आलं तर मस्त कैरो बघून होईल. मग काय, होऊ दे खर्च!

EgyptAir एक निराळीच airline निघाली. Emirates आणि Qatar Air ने त्यांचा सगळा बिझनेस “हब” या संकल्पनेवर बेतला. idea एकदम सोपी :- अमेरिका, युरोप वरून येणारी विमानं दुबई आणि कतार मध्ये थांबतात. काही तास स्टॉप घेऊन प्रवासी लगेच दुसऱ्या विमानांनी आशिया मध्ये. तेल स्वस्तात मिळाल्याने विमान चालवायचा खर्च पण कमी. या मुळेच दुबई एअरपोर्ट हा जगातला सगळ्यात मोठा “हब” एअरपोर्ट झाला. EgyptAir ला पण तसलच काहीतरी करावंसं वाटलं असावं, पण त्यांना तितकंसं यश आलेलं दिसत नाही. यांच्याकडे खूप विमानं आहेत, पण मी ज्यातून प्रवास केला ती सगळी जुनी, बुरशी आलेली, कधी हि पडतील (!) अशी होती. अक्षरशः जीव मुठीत घेऊन होतो मी. In Flight Entertainment म्हणून जुन्या वोल्वो बस सारखं समोर टीव्ही वर चित्रपट लावून ठेवलेला. बरं अगदीच बंडल म्हणावं तर जेवण आणि service एकदम छान. Business क्लास च्या प्रवाश्यांना असते तशी Kit Bag सुद्धा देतात हे.
कैरो विमानतळ तर खूप मोठा आहे. आमचं विमान लँड झाल्यावर मोजून अर्धा तास नुसतं टॅक्सी करत होतं. विमान थांबल्यावर बस ने अजून १५ मिनिटं इकडे तिकडे फिरवलं. मला वाटलं झाली आपली कैरो टूर! शेवटी रात्री ७ वाजता मी विमानतळात पाऊल ठेवलं. माझी connecting flight दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ ला. मी धीर करून थेट EgyptAir च्या काउंटर वर च हॉटेल स्टे च विचारलं. दोन चार वेळा इकडून तिकडे पाठवल्यावर शेवटी त्यांच्या एका कर्मचाऱ्याने मला सगळी process सविस्तर सांगितली. माझा boarding pass आणि पासपोर्ट EgyptAir त्यांच्या कडे ठेवून घेणार आणि आम्हाला बाहेर एका हॉटेल वर घेऊन जाणार. तिकडे तुम्ही तुमची flight येई पर्यंत एका रूम मध्ये राहायचं, जेवण, breakfast वगैरे included! अगदी चकटफू!
मला त्या क्षणी हा सगळा झोल तर नाही ना असा वाटलं! पण त्याने सांगितलं की ती बाकीची पसरलेली मंडळी पण याचीच वाट बघत आहेत! मी लगेच trip च पण विचारलं! EgyptAir ची स्वतःची Travel Company सुद्धा आहे: Karnak नावाची. याच कंपनी च्या तर्फे वेगवेगळ्या टूर्स प्लॅन केल्या जातात. मला Pyramids आणि Sphinx ची टूर चांगली वाटली. ४० जर अजून ३ जण मिळाले तर. आणि तेव्हाच मला माझ्या सारखाच विचार करून आलेले (आणि मुंबई लाच जाणारे!) ३ मित्र भेटले! आम्ही लगेच पैसे भरले. रात्री ११ ला शेवटी सगळ्यांचे “papers” आले. त्यांचा माणसाने आम्हाला कुठल्यातरी बाजूच्या दरवाजाने बाहेर काढलं आणि आम्ही इजिप्त मध्ये पाऊल ठेवलं!

सकाळी ७.३० वाजता आमच्या टूर ची गाडी येणार होती, जी अपेक्षेप्रमाणे ८ वाजता आली. आम्ही न्याहारी करून तयारच होतो. टूर गाईड नंतर जॉईन होणार असल्याने आमचा ड्राइवर त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये आम्हाला कैरो ची माहिती देत होता. आजूबाजूला सिमेंट आणि विटांनी बनलेल्या पण बोडक्या इमारती. रंगकाम वगैरे नाहीच, सगळीकडे नुसती रेती. वाळवंट काय असतं हे पहिल्यांदाच बघितलं मी! ड्राइवर ने आम्हाला चांगलंच बजावून ठेवलेलं. कोणत्याही अमिषाला भुलू नका.

कैरो मुख्य शहर मात्र म्हणज इस्लामी स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. तहरीर चौक भाग, जिकडे काही वर्षापूर्वी अरब क्रांती ची निदर्शने झाली होती, एकदम आपल्या दिल्ली सारखा वाटला! कैरोची जीवनदायिनी नाईल नसती तर त्या वाळवंटात राहण्याचं धाडस कोणीच केलं नसतं!
आम्ही थेट पायरॅमिड्स चा इकडे गेलो. ३ मुख्य पिरॅमिडस आणि आणि अनेक छोटे पिरॅमिडस हे १६३ किलोमीटर क्षेत्रफळात पसरले आहेत. १४७ मीटर उंच खुफू चा पिरॅमिड (Great Pyramid of Giza) अनेक वर्ष जगातील सर्वात उंच इमारत होती.


पुढचा स्टॉप होता अत्तर संग्रहालय. संग्रहालय कसलं, दुकान च होतं ते. गेल्या वर लगेच आमचं इजिप्तशिअन पद्धतीने स्वागत झालं. खास करून जास्वंदी च थंड सरबत ( Hibiscus tea), जे आम्ही प्यायलं! नंतर आम्ही पपायरस संग्रहालय / दुकानात गेलो. तिकडे आम्हाला पपायरस च्या फांद्या पासून इजिप्तशिअन्स कागद कसा बनवायचे, कसा रंगवायचे, त्यांची प्रतीकं अशा गोष्टी सांगितल्या.





एवढं सगळं होई पर्यंत १ वाजलाच होता. आम्हाला परत मुंबई ला जायचं विमान पकडायच आहे हे विसरून च गेलो होतो! आम्ही सर्व हॉटेल वर परत जाऊन जेवण करून तयात झालो. २ वाजता EgyptAir ची गाडी आली आणि आम्हाला विमानतळावर घेऊन गेली.


Customs ने मला माझा पासपोर्ट परत दिला तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला! इजिप्त चा कुठेही स्टॅम्प नाही! कोणाला सांगितलं तर खरं पण वाटणार नाही कि मी इजिप्त ला जाऊन आलो! कदाचित इजिप्त च्या लुप्त संस्कृती सारखंच ह्यात सुद्धा काहीतरी गूढ असावं! विमानाने टेकऑफ केल्यावर वाळवंट हळू हळू दिसेनासं झालं, तरी इजिप्त नावाचं मृगजळ मात्र मनात बराच वेळ राहिलं !
